मुंबई ः अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी-गिरवली-कवडगाव-अरणगांव यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुरूस्ती कार्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून आता 12.1 कि.मी. लांबीचा नवीन मार्ग तयार करण्यात येईल आणि त्यामुळे लगतच्या सर्व रहिवाशांना वाहतूक सुविधा प्राप्त होईल.
रस्त्याच्या कामासंदर्भात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी 29 जानेवारी 2025 च्या पत्राद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे विनंती केली होती.
त्यानुसार रस्ते कामाचा हा प्रश्न आता मार्गी लागत असल्याने या विभागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी व विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 31 मार्च, 2025 रोजीच्या पत्राद्वारे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांना उपरोक्त कामासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे.
सन 2024-2025 या वर्षासाठी अशाप्रकारे रस्ता दुरूस्ती, रस्ता रुंदीकरण, छोटे मोठे पूल उभारणीच्या राज्यातील एकूण 130 कामांसाठी 1 हजार 994 कोटी रुपयांच्या कामांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
Post a Comment