अहिल्यानगर ः श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात राज्यात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर अन्न भेसळ प्रतिबंधात्मक विभागाने राज्यातील काही ठिकाणी छापेही टाकले. मात्र त्यानंतर हे प्रकरण गुंडळालेले गेले असल्याची चर्चा सुरु आहे. या पनीरच्या मुद्यावर पुन्हा पाचपुतेही काही बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे पाचपुते यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यात एकही छापा होऊन कारवाई झालेली नाही.
राज्यात अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पुण्यातून अन्न आणि औषध विभागाने 1400 किलो पनीर जप्त करत कारवाईही केली होती. या घटनेचे पडसाद आता विधानसभेतही उमटले होते. यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बनावट पनीर घेतच विधिमंडळात प्रवेश केला होता. त्यांनी पोट तिडकीने हा प्रश्न सभागृहात मांडला होता.
पाचपुते यांनी आपल्या सोबत आणले गेलेले 70-75 टक्के पनीर कृत्रिम असल्याचे सांगत आज लक्षवेधीत अन्न आणि औषध प्रशासनासमोर त्यांनी हा प्रश्न मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासनही दिले होते.
हा प्रश्न अधिवेशनात मांडल्यानंतर अन्न भेसळ व प्रतिबंधात्मक विभागाने राज्यातील काही भागात पनीरची तपासणी सुरु केली. काही ठिकाणी कारवाई केली. मात्र हा प्रश्न मांडल्यानंतर दोन ते तीन दिवसच ही कारवाई मोहीम राज्यभर राबविण्यात आली. त्यानंतर भेसळयुक्त पनीर प्रकरणावर पडदा पडलेला आहे. त्यावरचा पडदा कोणीच उठवायला आता तयार नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ज्या पोटतिडकीने हा पनीरचा प्रश्न सभागृहात मांडून नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेल्या खेळ थांबविण्याची मागणी केली. त्यांच्याच तालुक्यात काही ठिकाणी भेसळयुक्त पनीर विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. परंतु अन्न भेसळ व प्रतिबंधात्मक विभागाने त्यांच्या तालुक्यात अद्यापही एकही ठिकाणची तपासणी केलेली नाही. त्यामुळे हा विभाग हे प्रकरण किती गांभिर्याने घेतोय, हे यावरून स्पष्ट होत आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पनीरची विक्री होत आहे. ही पनीरची विक्रीत काही ठिकाणी भेसळयुक्त पनीर सर्रास विक्री केले जात आहे. त्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सभागृहात प्रश्न उपस्थित करून तो मार्गी लागणार नाही. त्यासाठी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. तसेच हा प्रश्न कायम चर्चेत ठेवला तरच तो निकाली निघेल. नाही तर चर्चा झाली दोन ते तीन दिवसांनी विसरून गेले असेच झाल्याशिवाय राहणार नाही.
Post a Comment