नोकरी मेळाव्यातून तरुणांना चांगली संधी

संगमनेर :  युवकांनी जगामध्ये कुठेही जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे असून हा नोकरी मेळावा तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोकचळवळीच्या वतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये झालेल्या आय लव संगमनेर चळवळ अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात आज जिल्हाभरातून 7290 तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यासाठी आलेल्या 91 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून 2019 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. 

यावेळी व्यासपीठावर आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदी उपस्थित होते.

या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर तालुक्यासह जिल्हाभरातील 7290 युवक व युवतींनी सहभाग नोंदवला. टाटा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटी कंपन्या यांसह एकूण 91 कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना करिअरमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि नोकरी मिळून देण्यासाठी हा अत्यंत चांगला उपक्रम आयोजित केला आहे. ज्यांच्या मध्ये गुणवत्ता आहे. ज्यांच्याकडे चांगले  शिक्षण आहे. त्यांना ही चांगली संधी आहे. गुणवत्तेला मोठे महत्त्व असून ज्या विद्यार्थ्यांची किंवा तरुणांची निवड होईल. त्यांना काही कंपन्या प्रशिक्षण देतील. ती तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. याच बरोबर जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची मानसिकता ठेवली तर नक्कीच यश मिळणार आहे.

ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक युवकांना जगभरात मोठी संधी आहे. आणि ती संधी उपलब्ध करून देण्याचे काम या नोकरी मेळाव्यातून करण्यात आले आहे. यापुढेही तरुणांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतील असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post