अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवारी (ता. १६) होत आहे. यामध्ये जिल्हाध्यक्षाची निवड केली जाणार असल्याने, इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
शिक्षक संघात सुरवातीपासून आबासाहेब जगताप होते. त्यानंतर डॉ. संजय कळमकर व रावसाहेब रोहोकले गट दाखल झाले. हे तीन गट एकत्र आल्याने संघाची ताकद वाढली आहे. परंतु जिल्हाध्यक्ष पदावरून आता तानातानी सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्षपद कोणत्या गटाच्या नेतृत्वाखाली काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला रविवारी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित राहणार आहेत.
या वेळी संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा होईल. त्यात प्रामुख्याने संघाचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष या चार प्रमुखांची निवड जाहीर होऊ शकते. मात्र यात जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने श्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही गटात अंतर्गत गटबाजी सुरु झालेली आहे.काहींनी नेत्याला आवाहन दिले आहे. तर काहींनी थेट राज्याच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अधिवेशनात गटबाजी उफाळून येणार आहे. जिल्हाध्यक्षपदावरून वादाची थिणगी पडणार असून फाटाफूट होणार आहे, अशी चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरू आहे.
Post a Comment