नगर ः राजेंद्र नागवडे व अऩुराधा नागवडे दाम्पत्य अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून अनुराधा नागवडे - माजी आमदार राहुल जगताप यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता तालुक्यात व्यक्त केली जात आहे. याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आलेले आहे.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. परंतु आतापासून श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीची तयारी कार्यकर्ते करू लागलेले आहे. मागील निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने उमेदवारांना प्रचाराला संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केलेली आहे.
नागवडे दाम्पत्य आता अजित पवार यांच्या गटात दाखल होणार आहे. त्यांची अजित पवार यांच्याशी चर्चा झालेली आहे. ते आगामी काही दिवसातच अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. तसा शब्द त्यांना मिळाल्याने ते पक्ष बदल करीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत. या वेळी राहुल जगताप यांनी शरद पवार यांच्या गटाबरोबर रहाणे पसंत केलेले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत राहुल जगताप यांना उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे जगताप समर्थक आतापासूनच निवडणूक कामाला लागलेले असून तालुक्यात मोर्चेबांधणी करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
विधानसभा व लोकसभेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आगामी काळात होणार आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी मतदारसंघामध्ये कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरवात केलेली आहे. संक्रांतीनिमित्ताने आता महिला वर्ग मोठ्या प्रमाणात गावा-गावातील हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत.
काही नेत्यांच्या समर्थकांच्या घरी नेत्यांनीच हे कार्यक्रम भरविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका चुरशीच्या होणार असल्याचे यावरून दिसून येत आहे. सध्या तरी नेते व त्यांचे कुटुंबियांसह त्यांचे समर्थक मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त दिसून येत आहेत.
Post a Comment