नगर ः नगर-मनमाड रस्त्यावरील एका व्यापारी संकुलाला आग लागली. ही घटना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
नगर मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या- चांदीचे दुकाने, दवाखाना व इतर कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरती एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे.
या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणात आगीने रुद्रावतार घेण्यास सुरवात केली. दरम्यान या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्नीशमक दलाला देण्यात आली.
काही मिनिटात अग्नीशमक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग अटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली. याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या आगीमुळे किती नुकसान झाले याची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. मात्र आगीच्या घटनेने या व्यापारी संकुलातील सर्वांनीच धसका घेतला होता.
शहरात या अगोदरही व्यापारी संकुलांमध्ये आगीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी आता उपयायोजना म्हणून सर्वच इमारतीच्या वीज यंत्रणेचे आॅडिट करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा घटना घडतच राहतील, अशेी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
Post a Comment