नगर ः बाहेरच्या काहींचे ऐकून डफडे वाजवू नका. ते नुसते एकदा येऊन वाजवून अन् बोलून काही होत नसते, असे आमदार नीलेश लंके यांनी सुनावले आहे.
पारनेर तालुक्यातील सात कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ झाला. त्यावेळी त्यांनी मतदारसंघातील खासदार विखे समर्थकांवर नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी मतदारसंघातील विरोधकांना बाहेरच्यांचे डफडे वाजवण्यावरून इशारा दिला आहे. आमदार लंके यांचा हा रोख खासदार सुजय विखे व त्यांच्या समर्थकांकडे होता.
आमदार लंके म्हणाले, पारनेर तालुक्यात सोशल मीडियावरील वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. त्यांनी बाहेरच्या काहींचे डफडे वाजण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तालुक्याच्या चारही कोपऱ्यात डफड्यावाल्यांची संख्या वाढली आहे. नुसते एकदा येऊन वाजवून अन् बोलून काही होत नसते.
प्रत्यक्ष बोलून शाश्वत विकासकामांवर भर देऊन जनतेला दाखवून द्यावे लागते. तेव्हा लोक विश्वास ठेवतात. म्हणून आपण जे बोलतो तेच करतो, बाकीच्यासारखे नुसते बोलून लोकांना झुलवत ठेवत नाही, असेही ते म्हणाले.
Post a Comment