नगर ः अहमदनगरचेच काय तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती गंभीर झालेली आहे. ज परदेशात मुलींना फसवून नेले जाते. राज्यांमध्ये अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहेत, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहांमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीसंदर्भात संचालक मंडळासह नेत्यांची बैठक आयोजित केली होती त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, श्रीरामपूर येथील घटना सुद्धा ताजी आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न राज्यामध्ये गंभीर झालेला असतानाच आज पोलीस अधिकाऱ्यांना मोकळीक दिली जात नाही. वेळीच याकडे लक्ष देण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आजही राज्यांमध्ये कोयता गॅंग, दुचाकी तसेच चार चाकी गाड्या पेटवून देण्याचे प्रकार वाढत चाललेले आहे. याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खुन, दरोडे तसेच जातीय वादातून दंगली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. दिवसाढवळ्या चोऱ्या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंग सारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचा गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा धाक राहिल्याचे दिसत नाही. या सर्व प्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकाराबाबत पोलिसांचे अक्षरशः दुर्लक्ष झालेले दिसत आहे यामुळे नागरिकांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सोसावा लागत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना झालेल्या दिसत नाही.
नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा आहेत. जिल्ह्यासह राज्यभारातून ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. शहरामध्ये वारंवार गैरप्रकार होत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या जातीवादी तणावातून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा परिणाम थेट बाजारपेठ तसेच व्यापारी वर्गावर होत असतो. त्यामुळे ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते त्याचा नाहक त्रास होऊन ८/१० दिवस बाजारपेठ बंद ठेवावी लागते त्याचा परिणाम थेट व्यवसायावर होतो.
सर्व व्यवहार ठप्प होतात. याचबरोबर राज्यभर शहराची बदनामी देखील होत असते, तरी वरील बाबींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन अहमदनगर शहरासह जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी याकरिता आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून निवेदन दिले. त्याच मुद्द्यावर आता विरोधी पक्ष नेत्यांनी भाष्य केलेले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
Post a Comment