नगर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात विखे पिता-पुत्र आक्रमक झालेले आहेत. या दोन्ही पिता-पुत्राने आता जिल्हा पिंजून काढला आहे. आगामी काळात होणार्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचष्मा राहण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे ठरले होते. त्यानुसार अॅड. शेळके यांची अध्यक्षपदी तर अॅड. माधवराव कानवडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बुधवारी राबवली जाणार आहे. बँकेच्या निवडणुकीपासून विखे पिता-पुत्राची पिछेहाट झालेली आहे. आता राज्यात सरकार आल्यामुळे विखे यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे ते आता बँकेत वर्चस्व निर्माण करण्याची शक्यता आहे.
विखे पिता-पुत्र बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष घालणार का? भाजपचा उमेदवार अध्यक्षपदासाठी उभा करणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे असल्याने प्रशांत गायकवाड, माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील व माजी आ. राहुल जगताप यांचीही नावे आता चर्चेत आली आहे. या तीन जणाबरोबरच आता सीताराम गायकर यांचे नाव चर्चेत आले आहे.
Post a Comment