नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक दोन वर्षापूर्वी २०२० मध्ये झाली आहे. या निवडणुकीत बँकेच्या २१ संचालकांपैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे चार, भाजपचे सहा व एक शिवसेना असे पक्षीय संचालक विजयी झाले.
बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला दिले होते. त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अॅड. उदय शेळके यांना अध्यक्ष करण्यात आले. परंतु दुदैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने उदय शेळके यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले.
त्यामुळे जिल्हा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. तर भाजपाकडून शिवाजी कर्डिले यांचा उमेद्वारी अर्ज होता.
घुले-कर्डिले यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीमध्ये कर्डिले यांना १० तर घुले यांना ९ मते मिळाली. तर १ मत बाद झाले. अध्यक्षपदावर शिवाजी कर्डिले विजयी झाल्यानंतर कर्डिले समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत प्रशांत गायकवाड, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व माजी आमदार राहुल जगताप, सीताराम गायकर यांच्याबरोबरच अनुराधा नागवडे, आमदार मोनिका राजळे यांची नावे चर्चेत होती. परंतु ऐनवेळी निवडणूक होऊन त्यात कर्डिले यांनी बाजी मारली आहे.
Post a Comment