नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदाचे नाव विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी यांसदर्भात जिल्ह्यातील नेत्यांची नगरमध्ये बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी सर्वांची मते जाणून घेतली.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे ठरले होते. त्यानुसार अॅड. शेळके यांची अध्यक्षपदी तर अॅड. माधवराव कानवडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया बुधवारी राबवली जाणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सध्या प्रशांत गायकवाड, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व माजी आमदार राहुल जगताप, सीताराम गायकर यांच्याबरोबरच अनुराधा नागवडे, आमदार मोनिका राजळे यांची नावे चर्चेत आहे. आज नव्याने आमदार आशुतोष काळे यांचे नाव चर्चेत आले आहे.
आज विरोधी पक्षनेते अजित पवार नगर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सायंकाळी संचालक मंडाळाचे मते जाणून घेतली. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात व वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अध्यक्ष पदाचे नाव अंतिम केले जाईल, असे विरोध पक्षनेते पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान सर्व उपस्थित संचालक मंडळाशी विरोधी पक्षनेते पवार व आ. थोरात यांनी चर्चा केली. अध्यक्षपदाबाबत त्यांची मते जाणून घेतले. दोन ते तीन नावावर चर्चा झाली आहे. याबाबत आ. थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उद्या सकाळी नाव अंतिम केले जाणार आहे.
बँकेचा अध्यक्ष निवडीसाठी सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी पवार यांनी आज सायंकाळी संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. थोरात यांच्यासह आ. आशुतोष काळे, माजी आ. चंद्रशेखर घुले, अनुराधा नागावडे, आ. राहुल जगताप, माजी आ. भानुदास मुरकुटे आदी संचालक उपस्थित होते.
माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे, अनुराधा नागवडे यांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Post a Comment