सांगली ः वेळेवर पगार न झाल्याने एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सांगली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. सूर्यवंशी हे कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत होते. ते कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाचे रहिवाशी आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
न्यायालयाचा आदेश असूनही महामंडळाकडून वेळेवर मिळत नसल्याने भीमराव सूर्यवंशी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कवठेमहंकाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप केला होता. संपावेळी त्यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १५ तारीख उलटून गेली तरी सरकार कडून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही.
दरम्यान एसटी कर्मचार्यांच्या संपाच्या वेळी भाजप नेते पुढाकार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी प्रयत्न करीत होते. आता सत्तेत येऊनही भाजप एसटी प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment