संगमनेर : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी..नजरेत सदा नवी दिशा असावी.. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही.. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी', अशा आशयाचे ट्विट सत्यजीत तांबे यांनी केले आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे सत्यजित यांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्नशील असताना सत्यजित तांबे यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. यावरून ते मात्र काँग्रेसमध्ये परतण्यास इच्छुक नाहीत असे स्पष्ट होत आहे.
खांद्याला दुखापत झाल्याने दीड महिन्यानंतर संगमनेरमध्ये परतलेल्या बाळासाहेब थोरात यांनी काल सत्यजित तांबे यांचे काँग्रेस पक्षाने केलेले निलंबन मागे घेण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं.
सत्यजीतची टीम काँग्रेसमध्ये आणि तो एका बाजूला, मात्र सत्यजित काँग्रेसला तुझ्या शिवाय आणि तुलाही काँग्रेसशिवाय करमणार नाही, त्यामुळे काळजी करू नकोस असे बाळासाहेब थोरात भाषणादरम्यान म्हणाले होते.
थोरातांच्या वक्तव्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र आज त्यांनी केलेले ट्विट पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे.
Post a Comment