नगर - पिंपळगाव लांडगा (ता. नगर) येथील एका लग्न समारंभात भाजपाचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाले. या वादातून सातपुते यांच्या केडगाव येथील रंगोली हॉटेलवर दगडफेक केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान पिंपळगाव लांडगा येथील हाणामारी प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तर केडगाव येथील दगडफेकीप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात सत्तेत असलेले भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवा पदाधिकार्यांमध्ये वादातून हाणामारी झाल्याची घटना घडल्यामुळे बुधवारी दिवसभर नगर शहरासह जिल्ह्यात याचीच चर्चा होती.
मंगळवारी रात्री पिंपळगाव लांडगा येथे एका लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ओंकार सातपुते हजर होते. दोन्ही बाजूंचे कार्यकर्त्ये देखील तेथे उपस्थित होते.
ओंकार दिलीप सातपुते हा निखिल अशोक कापसे (वय 31 रा. बेरड गल्ली, भिंगार) याला म्हणाला,‘तु खूप या कर्डिलेंचा उदो, उदो करतो, त्यांचे फोटो व बीजेपी पक्षाची पोस्ट करतो’. असे म्हणून ओंकारसह 10 ते 15 जणांनी निखिल कापसे व इतरांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद कापसे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
मारहाणीत निखिल कापसे व संजय धोत्रे हे जखमी झाले आहेत. ओंकार दिलीप सातपुते, सुनील सातपुते, अनिकेत शिर्के (सर्व रा. केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान रात्री 10 वाजेच्या सुमारास अक्षय शिवाजी कर्डिले (रा. बुर्हानगर, ता. नगर) याने त्याचे 50 ते 60 अनोळखी साथीदारांसह विठ्ठल नानाभाऊ सातपुते (वय 46 रा. भुषणनगर, केडगाव) यांच्या केडगावातील हॉटेल रंगोलीसमोर गोंधळ घालून अंदाधुंद दगडफेक केली.
त्या दगडफेकीत हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या दोन ते तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहेत. तसेच काही दगड ग्राहकांच्या व विठ्ठल सातपुते यांना लागले आहेत. याप्रकरणी विठ्ठल सातपुते यांच्या फिर्यादीवरून अक्षय शिवाजी कर्डिले व त्याच्यासोबतच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Post a Comment