पाथर्डी : शहरातील पथ विक्रेते व फेरीवाले यांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनेचा व्यवसायिकांनी लाभ घ्यावा. या माध्यमातून आपल्या व्यवसायासह कुटुंबाची प्रगती साधावी असे आवाहन पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केले.
केंद्र सरकारच्या दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत पथविक्रेते व फेरीवाले व्यावसायिक यांच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी लांडगे बोलत होते.
यावेळी सहा प्रकल्प अधिकारी अनिल कोळगे,समूदाय संघटक समीना शेख, सर्वेक्षक किशोर गोरे, पथविक्रेता समितीचे सदस्य नितीन गटाणी, राजेंद्र भोसले, सुवर्णा कोकाटे, जया साठे, पद्मा पाटील, लंका अभंग आदी उपस्थित होते.
लांडगे म्हणाले की, पथविक्रेता व फेरीवाल्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने अतिशय पथदर्शी योजना चालू केलेली आहे. यामध्ये आधार कार्ड ला मोबाईल नंबर संलग्न केल्यास प्रत्येक व्यवसाईकाची नोंद सरकारकडे होणार आहे.
सुरुवातीला निकशात बसणाऱ्या व्यवसायिकाला दहा हजार रुपये कर्ज भाग भांडवलासाठी मिळणार आहे. याची फेड केल्यानंतर वीस हजार व त्यानंतर पन्नास हजार रुपये याप्रमाणे व्यावसायिकांना भरघोस कर्जरुपी मदत व्यवसायासाठी होणार आहे.
तरी सर्व व्यवसायिकांनी सर्वेक्षणासाठी सहकार्य करून कर्ज घेतल्यानंतर वेळेवर फेड करून आपली प्रगती साधावी, असे आवाहन लांडगे यांनी केले.
कुठली वस्तू गहाण न ठेवता मागील वर्षी या योजनेतून मला दहा हजार रुपये बिनव्याजी कर्ज मिळाले होते. याची वेळेवर फेड केल्यानंतर यावर्षी पुन्हा मला वीस हजार रुपये मिळत आहेत.अतिशय सुलभतेने बिनव्याजी कर्ज उपलब्ध होत असल्याने मोठी मदत या योजनेमुळे मला होत आहे. - सोनाली राऊत (पथविक्रेते व्यावसाईक)
Post a Comment