पाथर्डी : पाथर्डी पंचायत समितीच्या सन २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दहा सदस्याच्या जागेसाठी आरक्षणाची सोडत जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार शाम वाडकर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात काढण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय माळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
पाथर्डी पंचायत समिती निवडणूक २०२२ गणनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे : कासारपिंपळगाव = सर्वसाधारण महिला, कोरडगाव = सर्वसाधारण महिला, भालगाव -सर्वसाधारण, अकोला - सर्वसाधारण महिला, माळीबाभुळगाव =सर्वसाधारण, तिसगाव = ना.मा.प्र. महिला, मिरी =ना. मा. प्रवर्ग व्यक्ती, करंजी- सर्वसाधरण, माणिकदौंडी = सर्वसाधारण, टाकळीमानुर = अनुसुचित जाती महिला.
याप्रमाणे आरक्षण सोडत निघाले आहे.पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रकला सोमनाथ खेडकर यांचा टाकळीमानूर गण अनुसूचित महिलेसाठी
राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. मात्र जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण झाल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तिसगाव गणना मागास प्रवर्ग महिला राखीव झाल्याने विद्यमान सदस्य सुनिल परदेशी यांचीही अडचण झाली आहे.
मिरी गणातून राहुल गवळी, माणिकदौंडी गणातुन सुनिल ओव्हळ, माळीबाभुळगाव गणातून रविंद्र वायकर, करंजी गणातून एकनाथ आटकर, कोरडगाव गणातून माजी सभापती सुनिता गोकुळ दौंड यांना संधी मिळू शकते.
पंचायत समितीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षात दुरंगी लढत होईल. जिल्हा परिषदेचा कासारपिपंळगाव हा एकमेव गट महिलेसाठी राखीव झाला आहे. तेथे कासार पिपंळगावच्या विद्यमान सदस्य राहुल राजळे व कासार पिंपळगावच्या विद्यमान सरपंच मोनाली राजळे यांना संधी मिळू शकते.
राष्ट्रवादीकडून माजी जि.प.सदस्या योगिता राजळे यांना पुन्हा रिंगणात उतरविले जाऊ शकते. भालगाव जिल्हा परीषद गटामधे विद्यामान सदस्या प्रभावती ढाकणे यांना राष्ट्रवादी पुन्हा संधी मिळु शकते. भाजपाकडून भालगावच्या सरपंच डॉ. मनोरमा खेडकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा आहे. पक्ष कोणाला संधी देईल हे वेळ आल्यावर समजेल.
टाकळीमानूर जिल्हा परीषद गटात भाजपाकडुन जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे व विद्यमनमा जिल्हा परिषद सदस्या ललिता शिरसाट यांचे पती व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट, पिपंळगाव टप्पाचे सरपंच पांडुरंग शिरसाट यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.
तसेच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अंकुश चितळे हे सुद्धा इच्छुक आहेत.मिरी-करंजी जिल्हा परिषद गटात राष्टवादीकडून पंचायत समितीचे माजी सभापती सभाजी पालवे, युवा नेते अमोल वाघ, शिवसेनेकडून माजी जि.प.सदस्या उषाताई कराळे यांच्या नावाची चर्चा आहे.
भाजपाकडून चारुदत्त वाघ, वैभव खलाटे, करंंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर, मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे यांच्यापैकी एकाला संघी मिळू शकते. तिसगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून विद्यमान जि.प.सदस्या संध्या आठरे यांचे पती पुरुषोत्तम आठरे, मढीचे सरपंच व कानिफनाथ देवस्थान समीतीचे अध्यक्ष संजय मरकड, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कुशल भापसे प्रबळ दावेदार आहेत.
येथे यांच्या पैकीच एकाला संधी मिळू शकते. राष्ट्रवादीकडून माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांचे नाव आघाडीवर आहे.
Post a Comment