नगर : जिल्हयातील पाथर्डी तालुक्यामधील डमाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ही शाळा २३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळेत कोरोनाची लागण होण्याचे प्रकार राज्यातील शहरासोबतच ग्रामीण भागात देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
डमाळवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा सुरु असताना मुख्याध्यापकांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करून घेतली होती. मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्याचा निर्णय झाला.
पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर १५ विद्यार्थी आणि शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता खबरदारी म्हणून त्यांच्या पालकांचीही चाचणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बाधित आढळून आलेल्या मुख्याध्यापकासह पाचही विद्यार्थी ठणठणीत आहेत. त्यांच्यावर नियमानुसार उपचार आणि दक्षता घेणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच शाळांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Post a Comment