आमचा ही थोडा विचार करा हो... आरोग्य कर्मचारी व्यक्त करू लागले भावना...

आम्हीही माणसे आहोत... आमचा ही थोडा आता विचार करा हो... आमच्या जागेवर उभ राहून कसे काम करावे लागते... या सर्वांनी विचार करा हो... असेच बोल आता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे. गेल्या दीड वर्षांपासून अहोरात्र रुग्णांची सेवा आता आरोग्य विभागाकडून केली जात आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना कामातून सुटका अद्यापही मिळालेली नाही. कोरोनाचा आकडा रोज कमी जास्त होत असून कोरोना कधी थांबेल, याचीच आता सर्वांन काळजी लागलेली आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु होऊन दीड वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. कोरोनामुळे अखं जग थांबलं होते. मात्र आरोग्य यंत्रणेसह पोलिस प्रशासनाचे कामकाज सुरु होते. यामध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील काहींनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. तर काहींना आपला जिव गमवावा लागला. मात्र जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत आरोग्य यंत्रणेसह पोलिस प्रशासनाने सोडले नाही. 

तब्बल दीड वर्षे आरोग्य यंत्रणेसह पोलिस प्रशासन दिवस-रात्र जनतेसाठी राबत आहे. बाधित झालेल्यांवर आरोग्य यंत्रणेकडून उपचार केले जात आहे. तर पोलिस प्रशासानाकडून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दिलेल्या नियमावलीचे नागरिकांन पालन करावे, यासाठी रस्त्यावर उभे राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. नियमांचे पालन व्हावे, सर्वजण सुरक्षित रहावे, यासाठी काही वेळा पोलिस प्रशासनाकडून दंडही केले जात आहे. 


मागील वर्षापासून आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यासाठी आता व्यस्त झालेले आहेत. आताही नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न केले जात आहे. आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सुरु झालेली आहे. रुग्णांवर उपचार, कोरोना तपासणी व लसीकरण अशी तीन कामांबरोबरच आरोग्य विभागाला दैनंदिन कामही करावे लागत आहे. त्यामुळे आता कामाचा व्याप वाढलेला आहे.

आरोग्य विभागाकडे कामाचा व्याप वाढूनही त्यांच्याकडून विना तक्रार आता कामकाज सुरु आहे. त्याचा त्यांना फायदा मात्र अद्याप झालेला नाही. मात्र मनस्ताप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. कामे करूनही काही ठिकाणी दमबाजीचे प्रकार आता घडू लागलेले आहे.

गेल्या दीड वर्षापासून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या रजा बंद झालेल्या असून अद्यापही रजा मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे. जगावर आलेल्या संकटाशी लढण्यासाठी सर्वच सज्ज झालेले आहे. तसेच आम्ही सज्ज आहोत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी आता वाढत चालला आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने व प्रशासनाने कितीही सूचना केली तरी प्रत्येकाने नियम पाळण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या सेवेसाठी आम्ही सज्ज आहोत. पण नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा आता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

आजार आहे, त्याचा प्रादुर्भाव होणार असला तरी त्याला रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आमच्या जागेवर उभे राहून विचार करूनच मग पुढील निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आता आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post