भाकरीच्या शोधात भटकणाऱ्या समाजाचा टाहो म्हणजे 'मरणासन्न हयातीची आर्जवे'


डॉ. चंदू पवार लिखित नुकताच प्रकाशित झालेला 'मरणासन्न हयातीची आर्जवे' हा काव्यसंग्रह वाचण्यास हाती आला.सदर काव्यसंग्रहास प्रसिद्ध कवी डॉ.संजय बोरुडे यांची सखोल,चिंतनशिल प्रस्तावना लाभलेली असून कवी देवा झिंजाड यांनी पाठराखण केलेली आहे.'मरणासन्न हयातीची आर्जवे' या काव्यसंग्रहात एकून पंच्याहत्तर कविता असून त्या व्यथेची आर्जवे,मरणासन्न हयात,ठिगळातल्या जखमा व गळफासातल्या माना अशा चार भागामध्ये विखूरलेल्या असून सर्व कविता वाखाण्यासारख्या आहेत.

पिढ्या न् पिढ्या केवीलवाणी आर्जवे करत खितपत पडलेल्या तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीच्या शोधात भटकणाऱ्या समाजाचा टाहो म्हणजे 'मरणासन्न हयातीची आर्जवे' होय.कवी आपले मनोगत व्यक्त करतानाच म्हणतो की,वर्षानुवर्षे समाजात काही घटक,काही जाचक रूढी,काही जीवघेण्या प्रथा,गरीबी,अन्याय, अत्याचार हे अजूनही हयात असल्याने अनेक समाज घटक मरणासन्न अवस्थेत पडलेले आहेत...अन् आजही आपण पाहतोय परंपरेने वंचीत राहिलेला समाज आपल्या आतड्यांना पिळ देवून मोकळ्या आभाळाखाली भळभळत्या वेदनांना फुंकर मारत,जाचक रुढी परंपरेला संभाळत पाठीला पोट चिटकवून जगत आहे.या जाचक रूढी-परंपरा मोडून काढल्या पाहिजे,या दुःख यातना सरल्या पाहिजे म्हणून कवी आपल्या पहिल्याच आर्जव या कवितेत म्हणतो की,

सगळं अंधारून आलं आहे भोवताली

उजेड दाखविण्या शब्दांचे काजवे आहेत

देण्या हास्य त्यांच्या गाली

पानोपानी मांडले आसवे आहेत

केवळ पाझर फुटावा

इथल्या निर्दयी समाजाला

म्हणुन त्या

मरणासन्न हयातीची ही शब्दरूपी आर्जवे आहेत...

काट्यांनी वेढलेल्या झुडपात जीवाच्या आकांताने जगण्याची चेष्टा करणाऱ्या समाजाला वेळेवर पोटात ढकलायला दोन वेळेचं घास मिळत नाही की,कोवळ्या अंगांना झाकण्यासाठी कापडं मिळत नाही.एरव्ही कसाबसा गरीबीला कुरवाळीत जगत आलेला हा समाज सणासुदीला मात्र छिन्नविछिन्न होवून जातो.चहूकडे आनंद शिंपडीत येणारी दिवाळी जणू झोपडीचा अंत पाहण्यासाठीच आलेली असते.प्रतिष्ठित वर्गातील बायकांनी घातलेले दागदागीने अन् मुलांचे रंगीबेरंगी नवे कपडे पाहून झोपडीतल्या बायकोची मनस्थिती व लेकराचा हुंदका आवरताना कर्त्या पुरुषाचे काळीज चहूबाजुने कुरतडले जाते.तेव्हा जीवाची झालेली घालमेल उलगडताना कवी म्हणतो की,

ऐक ना भाऊ

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी,

लक्ष्मीच्या पावलांनी चालत येते म्हणे...

आमच्या झोपडीचा पत्ता तेवढा देता का हो तिला

बायका पोरांचे खूप आशीर्वाद मिळतील बघा..!

वसुंधारेची लेकरं आपण तिच्याच अंगा - खांद्यावरती खेळलो,बागडलो अन् मोठेही झालो.आपल्या सर्व गरजा तिनेच पूर्ण केल्या.वृक्षवेली, पशूपक्षी ही सर्व आपलीच भावंडे.वसुंधरेशी एकनिष्ठ राहिली अन् माणुस मात्र कृतघ्न झाला.आपल्या पांचाट गरजा पूर्ण करण्यासाठी,आधूनिकतेच्या नावाखाली माणसाने अनेक झाडांना मुळासकट उखडून टाकले.खूलेआम निर्दयपणे सर्रास झाडांची कत्तल केली.उभ्या झाडांची लाकडं करून विकासाची प्रमाणपत्रे वाटणारा माणुस येणाऱ्या पुढच्या पिढीला आपदा,महामारी,दुष्काळ तसेच नवनविन जीवघेण्या रोगांच्या जबड्यात मरण्यास सोडून आपलेच खरकटलेले हात आपल्याच कपड्यांना पुसून डांगोरा पिटवीत आहे.हे सांगताना कवी आपल्या 'लाकडं' या कवितेतून सांगतो की,

केल्या कत्तली 

टाकल्या फांद्या छाटून

ढसाढसा रडती झाडे

ओल्या पापण्या मिटून...

औषधाला तरी इथे

आता झाड असणार का ?

कृत्रिम प्राणवायू खरंच

माणसाला पोसणार का ?

अडाणीपणाची लक्तरं केव्हाच वेशीला टांगून शिक्षणाची गंगा घरोघरी येवून पोहोचली आहे. शिक्षणाने माणसाच्या जगण्याचा अर्थच बदलून टाकला आहे.परंतू तरीही बुध्दीची दारं बंद करून स्पर्धेच्या नावाखाली काही बुद्धीजिवी जिव मुठीत घेऊन वावरताना दिसत आहेत.दोन पायावर चालायचे शिकले म्हणजे सर्वकाही शिकले असे होत नाही तर अज्ञानाचे रंध्रे मोकळे करून चांगल्या विचारांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय.त्यामुळे माणुस मशिन निर्मिती करतोय की,काय असेच वाटते.

काय मिळवायचं

याची पुसटशी कल्पना नसतानाही

जो तो उतरला आहे स्पर्धेत

आणि धावतो आहे जिवाच्या आकांताने

दुसऱ्यांना पायाखाली चिरडून...

खरं तर हे असे नकारात्मक विचार खोडून सकारात्मक विचारांची पेरणी करणे फार महत्त्वाचे झाले आहे.या असल्या जीवघेण्या स्पर्धेतून आनंद,सुख,शांती न मिळता शेवटी निराशाच आपल्या पदरात पडते.तेव्हा कवी पुढे म्हणतो की,

सुख मानण्यात आहे पण

आम्ही त्याची दुकानं थाटून बसलो आहोत

आणि आम्हीच झुंबड पाडली आहे

ते खरेदी करण्यासाठी...

अशा या मार्मिक,आशयघन ओळी वाचल्या की,काहीतरी वेगळे वाचल्याचा प्रत्यय वाचकाला आल्याशिवाय राहत नाही.संवेदनशील मनावर दस्तक देणाऱ्या व्यथा काळीज पिळवटून रक्तभंबाळ करणारे शब्द वाचक जसजसा वाचत पुढे सरकतो तसतसा त्याला कवीच्या शब्दसामर्थ्याचा प्रत्यय येत राहतो.या बाबीचा इथे आवर्जुन उल्लेख करावा वाटतो.म्हणून सांगावेसे वाटते की,वाचकाच्या मनाचा ठाव घेण्यात कवी डॉ.चंदू पवार सोळा आणे यशस्वी झाले आहेत तसेच त्यांनी वाचकाला अंतर्मुख करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

- संदीप राठोड, निघोज, ता. पारनेर 

मोबाईल -९९ २२ ६६ ३५ ९५


कवीता संग्रह - मरणासन्न हयातीची आर्जवे

कवी - डॉ.चंदू पवार

प्रकाशक - ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक

पृष्ठ - १००

मूल्य - १२५


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post