माणिकदौंडी येथे कोविड केअर सेंटर सुरु... सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक कुंडलिक राठोड यांच्या हस्ते उद्घाटन.. मदतीचा ओघ सुरू


पाथर्डी ः
तालुक्यातील माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालय येथे लोकसहभागातून माणिकदौंडी परिसर कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे नुकतेच निवृत्त सहायक निबंधक कुंडलिक राठोड, प्रांताधिकारी देवदत्त केकाण व तहसीलदार शाम बाडकर, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, गटविकास अधिकारी शीतल खिडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

कोरोना काळापासून माणिकदौंडी परिसरातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. या परिसरात रुग्णांची उपचाराची सोय नव्हती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर, तांड्यावर कोरोनाची लागण झाली आहे. वाढती रुग्ण संख्या चिंताजनक होती. या परिसरातील रुग्णांना पाथर्डी तालुक्याच्या वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये भरती व्हावे लागायचे. काही सेंटरमध्ये बेड शिल्लक नाही, ऑक्सिजन नाही, अशी गैरसोय व्हायची.

या बाबींचा विचार करून माणिकदौंडी गावचे उपसरपंच समीर पठाण व माणिकदौंडीचे तलाठी राजेंद्र मेरड यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते व लोकसहभागातून माणिकदौंडी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

या कोविड सेंटर उभारण्यासाठी सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक कुंडलिक राठोड यांनी 51 हजार, माणिकदौंडी मेडिकल असोशियन 51 हजार, उपसरपंच समीर पठाण 25 हजार, आल्हनवाडी सरपंच मनीषा कर्डिले 25 हजार, चितळवाडी सरपंच संजय चितळे 11 हजार रुपये, आल्हणवाडी उपसरपंच परमेश्वर गव्हाणे पाच हजार, मनसेचे युवा नेते शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांच्याकडून एक क्विंटल साखर आणि 50 पिण्याच्या पाण्याचे बॉक्स अशी देणगी देऊन या सर्वांनी खूप मोलाचे सहकार्य केले आहे.

कोविड सेंटरसाठी पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत सदस्य रमीज पटेल व चहापाणी व्यवस्था प्रा.सुनिल पाखरे यांनी केली. माणिकदौंडी येथील सर्व किराणा व्यवसायिक व परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांनीही या कामात मदत केली आहे. यावेळी पंचायत समिती गटनेते सुनिल ओव्हाळ,शिवाजी मोहिते, परिसरातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

माणिकदौंडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला परिसरातील नागरिकांनी शक्य होईल. तेवढी मदत देणगी स्वरूपात द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामीण व कायम दुष्काळी भागातील व उसतोडणी मजुरांनी उभारलेल्या या कोविड सेंटरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post