ठराविक कोव्हीड सेंटरला दिल्या भेटी.... मंत्र्यांच्या दौर्यामुळे पक्षातील नेते अन् कार्यकर्ते नाराज...

 


अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्याचा नुकताच एका मंत्री महोदयांनी दौरा करून तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या दौर्यामुळे त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते व नेते नाराज झालेले आहेत. काहींनी थेट नाराजी व्यक्त केली तर काहींनी समाज माध्यमावर पोस्ट टाकून आपल्या भावनांना संदेशातून वाट मोकळी करून दिलेली आहे.

कोरोना परिस्थिती जिल्ह्यात वाढलेली आहे. तिला नियंत्रणात आणण्यासाठी सध्या प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेतला जात आहे. याच बरोबर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांकडूनही आढावा घेणे सुरु आहेत. जिल्ह्यातील मंत्र्यांकडून ही प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. या आढावा दौर्यात मंत्री महोदयांकडून तालुक्यात सुरु झालेल्या कोविड सेंटरला भेटी देऊन तेथील आढावा घेतला जात आहे.

जिल्ह्यातील एका मंत्री महोदयांनी श्रीगोंदा तालुक्याचा नुकताच दौरा केला. यामध्ये श्रीगोंद्यातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. या दौर्यात त्यांनी 

कोळगाव,  पिंपळगाव पिसा, बेलवंडी येथील कोविड सेंटरला भेटी दिल्या. या दौर्यात मात्र त्यांच्याकडून  घारगाव, लोणी व्यंकनाथ, देवदैठन, आढळगाव येथील कोव्हिड सेंटर ला भेटी देणे झालेले नाही. या वरून नेत्यांसह कार्यकर्ते नाराज झालेले आहेत.

नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून गावोगावी कोव्हीड सेंटर चालू करण्यात आलेले आहेत. लोकसहभागातून ही सेंटर चालवत असणार्या कार्यकर्त्यांना मंत्र्यांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नव्हती. पण फक्त भेट देऊन पाहणी केली असती तर काम करण्यास उर्जा मिळाली असती अशी भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान मंत्र्यांना उर्वरित कोव्हिड सेंटरला भेटी देण्यापासुन कोणत्या कार्यकर्त्यांनी रोखले का ? त्यांच्याकडे वेळ कमी होता, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावरून काहींनी थेट नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. तर काहीजण समाज माध्यमावर संदेश टाकून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत आहे. 

कोणाच्या सांगण्यावरून जर मंत्री महोदयांनी भेटी टाळल्या असतील तर त्या पक्षाच्या दृष्टीने घातक ठरणार्या आहेत. त्यामुळे अशा नेत्यांना पुढील दौऱ्याच्या वेळी दूर सारून दौरा करावा, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. 

वेळ कमी असेल तर लवकरच तालुक्यात येऊन राहिलेल्या कोविड सेंटरला भेटी देऊन कार्यकर्ते व नेत्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे गरजेचे आहे. ते आगामी काळात फायद्याचे ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post